
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संयम अखेर सोमवारी (दि.१२) संपला. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या ७२ पदव्युत्तर निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा थेट फटका ओपीडी आणि आयपीडी सेवांना बसला असून, शेकडो रुग्णांना उपचाराविना परतावे लागले.
दंत महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ७२ पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना दरमहा सुमारे ७० हजार रुपये वेतन मिळते. याच रकमेतून मेस शुल्क, पुस्तके, स्टेशनरी तसेच दैनंदिन खर्च भागवावा लागतो. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून एकही वेतन न मिळाल्याने डॉक्टर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला.
सोमवार असल्याने रुग्णालयात मोठी गर्दी होती. दंत रुग्णालयातील बहुतांश उपचार निवासी डॉक्टरांवर अवलंबून असल्याने कामबंद आंदोलनामुळे उपचार सेवा जवळपास ठप्प झाल्या. अनेक रुग्णांना ‘उद्या या’ असे सांगून परत पाठवण्यात आले, तर काही रुग्ण दुपारपर्यंत नंबरची वाट पाहत बसून राहिले. दंत उपचार ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने दूरवरून आलेले रुग्ण विशेषतः निराश झाले.
काही निवासी डॉक्टर कर्जबाजारी-
वेतन न मिळाल्याने काही निवासी डॉक्टर कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत, तर काहींना दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढावे लागल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी ५० हून अधिक निवासी डॉक्टरांनी डीन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. वेतन वितरणाबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे नियमित पाठपुरावा सुरू असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेतन देण्यास विलंब झाल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले.










