Published On : Sat, Apr 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाडी हत्या प्रकरणाचा उलघडा; कार लुटण्याच्या हेतूने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केला खून, तिघांना अटक!

Advertisement

 

नागपूर : वाडी परिसरात समोर आलेल्या धक्कादायक खूनप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपींना गजाआड केले आहे. कार लुटण्याच्या हेतूने तिघा बीटेक विद्यार्थ्यांनी मदतीचे नाटक करत एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याचे तपासातून उघड झाले असून या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

खडगाव रोडवरील लावा स्मशानभूमी परिसरात एका व्यक्तीचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने सुरुवातीला ही ‘ब्लाइंड मर्डर’ म्हणून पोलिसांसमोर आव्हान होते. मृताची ओळख सुचित भोजापुरे अशी पटली. या प्रकरणी आर्यन शेंडे, रिशांक कांबळे आणि अनुज वाघमारे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, तिघे आरोपी पारडीकडून जात असताना वर्धमान नगर उड्डाणपुलाजवळ एका कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत बसलेला व्यक्ती त्यांना दिसला. संवाद साधल्यानंतर तोच व्यक्ती त्यांना सोबत घेऊन पुढे निघाला. काही अंतर प्रवास केल्यानंतर त्याने वाडी येथील घरी सोडण्याची विनंती केली.

Advertisement

आरोपींनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला; मात्र घरी पोहोचल्यावर दरवाजा बंद आढळला. यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला पुन्हा गाडीत बसवून निर्जन भागाकडे नेले. याच दरम्यान कार लुटण्याचा विचार पक्का करत खडगाव रोडवर गाडी थांबवून दगडाने डोक्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली.

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह झुडपात टाकून दिला आणि कार तसेच दोन मोबाईल घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना अटक करण्यात यश आले.

विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले तिघेही युवक नंदनवन परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.