Published On : Thu, Apr 18th, 2024

नागपूर,रामटेक मतदासंघात उद्या मतदान;प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील स्थानिक प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भात बुधवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते.

नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत एकूण ४,५१० मतदान केंद्रे आहेत. यामध्ये रामटेकमध्ये २,४०५ तर नागपूरमध्ये २,१०५ मतदान केंद्रे राहणार आहेत. जिल्ह्यातील एकूण ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संपूर्ण मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण २१ हजार ६४८ अधिकारी,कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.तसेच पोलीस प्रशासनाकडूनही अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे.

दरम्यान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदान केंद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असलेल्या प्रत्येक मतदारास मतदान अधिकारी कूपन देतील. ज्यांच्याजवळ कूपन असेल, त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.