Published On : Mon, Jun 24th, 2019

फडणवीस-गडकरींच्या विकासावर मतदारांचा विश्वास : पालकमंत्री

नागपूर: बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले असून मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकास कामांवर विश्वास दाखवत भाजप-सेनेच्या बाजूने आपला कौल दिला, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

या नपची ही पहिलीच निवडणूक होती.18 पैकी 16 जागा युतीच्या पारडयात मतदारांनी टाकल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याची भाजपची घौडदौड सुरूच आहे. या निवडणूकीत काँग्रेस एकाकी पडली.

काँग्रेस पक्ष आपला एकही नगरसेवक निवडून आणू शकला नाही , एवढी दारूण स्थिती मतदारांनी काँग्रेसची केली. पुन्हा एकदा ग्रामीण भागातील जनताही विकास कामांसोबतच असल्याचे या निवडणूकीने सिध्द केले आहे.

पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत पक्षाला नेत्रदिपक यश मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, असे सांगताना विजयी झालेल्या सर्व नगरसेवक व अध्यक्षांचे पालकमंत्री बावनकुळे यांनी अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले आहे.