Published On : Sat, Nov 28th, 2020

वंजारी कुटुंबीयांनी समाजालाच लुटले

प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष खा. रामदास तडस यांचा गंभीर आरोप

नागपूर : स्वत:च्या संस्थांचा विकास करण्यासाठी सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या वंजारी कुटुंबीयांनी केवळ आणि केवळ स्वविकासासाठी राजकारणाचा उपयोग केला. तेली समाजातील कर्तृत्ववान, ज्येष्ठ समाजसेवकांनी समाजबांधवांच्या सहकार्याने उभारलेल्या संताजी महाविद्यालयाला कपटाने स्वत:च्या खिशात घातले. तेथील कर्मचारी असलेल्या समाजबांधवांना नोकरीवरून काढत आर्थिक व्यवहार करून नव्या प्राध्यापकांना नोकरीवर रुजू केले, असा गंभीर आरोप वर्धेचे खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस यांनी केला.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी हे जातीच्या आधारावर मते मागत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्याच समाजाचे असलेले खासदार रामदास तडस यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांनी एक पत्रक प्रकाशित करून ‘पोलखोल’ केली आहे. या पत्रकात नमूद केल्यानुसार, तेली समाजातील ज्येष्ठ समाजसेवक मधुकरराव आकरे, मोतीराम उमाटे, सुरेशबाबू देवतळे यांनी तेली समाजाचे आद्यदैवत संताजी महाराज यांच्या नावाने नागपूर-वर्धा मार्गावर महाविद्यालय सुरू केले. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि समाजातील होतकरू सुशिक्षितांना नोकरी हा महाविद्यालय स्थापनेमागील उद्देश होता. समाजातील अनेक दानशूर लोकांना या महत्‌कार्यासाठी मदत केली. मात्र समाजाची ही संस्था वंजारी कुटुंबीयांनी कपटाने हडपली. समाजकार्य करणाऱ्या आणि नोकरीवर असलेल्या सर्व समाजबांधवांना काढले. स्वत:च्या कुटुंबातील मुलगा, मुलगी, सुना, जावई आदींना सभासद करून संस्था कुटुंबाच्या ताब्यात घेतली. संस्था काढली कोणी आणि संस्थेचे मालक बनले कोण, असा सवाल खासदार तडस यांनी उपस्थित केला आहे.

वंजारींविरोधात प्राध्यापकाचे बंड

इकडे निवडणूक आली की समाजाच्या नावावर मदत मागायची आणि दुसरीकडे समाजाच्या मालकीच्या संस्था हडपायच्या, समाजबांधवांकडूनच नोकरीवर घेण्यासाठी पैसे घ्यायचे आणि नंतर त्यांचा छळ करायचा, हा वंजारी कुटुंबीयांचा उद्योग बनला असल्याचे गंभीर आरोपही या पत्रकातून खासदार रामदास तडस यांनी केले आहे. सध्या वंजारींच्या संस्थेत असलेले कर्मचारी कमालीचे त्रस्त आहे. मागील सहा महिन्यांपासून त्यांना वेतन मिळाले नाही. सर्वांना निवडणुकीच्या कामात जुंपले आहे. इतकेच काय तर दलित समाजाचे प्राध्यापक डॉ. विनोद राऊत यांनी स्वत:च पदवीधर निवडणुकीत उडी घेतली असून वंजारींविरुद्धच बंड पुकारले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.