Published On : Fri, May 4th, 2018

वीरेंद्र सिंह यांनी स्वीकारला मनपा आयुक्तपदाचा कार्यभार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून वीरेंद्र सिंह यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त अश्विन मुदगल यांनी त्यांच्याकडे सूत्रे सोपविली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त महेश धामेचा, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खडणवीस उपस्थित होते.

मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह हे यापूर्वी मंत्रालयात नगर पालिका प्रशासनचे संचालक व आयुक्त म्हणून कार्यरत होते. ते २००६ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी औरंगाबाद व सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. काही काळ ते माहिती तंत्रज्ञान विभागाच्या डिजिटल कक्षात होते. या विभागात त्यांनी उत्कृष्ट काम केले. यूपीएससी परीक्षा देण्यापूर्वी ते एअर इंडियात कार्यरत होते. नोकरी सोडून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड झाल्याननतर त्यांनी विविध ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रशासनात जलदगतीने निर्णय घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

Virendra Singh takes charge as NMC Municipal Commissioner
पदभार स्वीकारल्यानंतर नवे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांची ओळख करवून घेत त्यांच्याकडे असलेल्या कामांचा आढावा घेतला. शिस्त, सचोटी आणि कार्यक्षमतेने एकत्रित मिळून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी विभागप्रमुखांना केले. आपला पुढील कार्यकाळ शहराच्या हितासाठी व विकासासाठी असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.