Published On : Fri, Mar 23rd, 2018

पाचपावली सुतिकागृहाचा होणार कायापालट

Advertisement


नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित उत्तर नागपुरातील पाचपावली सुतिकागृह ‘मॉडेल’ करण्याचा प्रस्ताव आहे. नागपूर महानगरपालिकेला तसा प्रस्ताव प्राप्त झाला असून पुढील तीन महिन्यात या सुतिकागृहाचा संपूर्ण कायापालट होणार आहे. सध्या १० खाटांची क्षमता असलेल्या पाचपावली सुतिकागृहात पुन्हा ३० खाटांची भर पडणार आहे.

स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी एका विशेष बैठकीत ही माहिती दिली. सदर बैठकीचे आयोजन शुक्रवारी (ता. २३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात करण्यात आले होते. बैठकीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक मनोज सांगोळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे विभागीय कार्यकारी अभियंता राजेंद्र लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, पाचपावली सुतिकागृहाच्या प्रमुख डॉ. सीमा पारवेकर, भाजपचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष दिलीप गौर, महामंत्री रवींद्र डोंगरे, सुनील मित्रा, संजय तरारे, डॉ. एम. सी. थोरात, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, डॉ. संगीता बलकोटे उपस्थित होते.

आरोग्य सेवा उपसंचालकांनी सदर प्रस्ताव महानगरपालिकेपुढे ठेवला आहे. सुतिकागृहाचे प्लोरिंग बदलवणे, स्वच्छता व्यवस्था व्यवस्थित करणे, रंगरंगोटी करणे, इमारतीला काही लिकेजेस आहेत, ते दुरुस्त करणे, इमारतीच्या उपयोगात नसलेल्या जागेत आवश्यक ते बांधकाम करून खाटांची संख्या वाढ या बदलाचा प्रस्तावात अंतर्भाव आहे. मोकळ्या जागेतील शिकस्त इमारती निर्लेखित करून तेथे ॲम्पी थिएटर आणि हिरवळ तयार करण्याचेही प्रस्तावित आहे. स्थापत्य विषयाचे काम पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक मशिनरीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्याला २२ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले.

दरम्यान, या सुतिकागृहाचे नूतनीकरण एनयूएचएमअंतर्गत प्रस्तावित असून त्याचा कार्यादेश झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे यांनी दिली. जर कार्यादेश झाले असतील तर राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार ते बांधकाम करण्यात यावे. सुरक्षा सोयी उपलब्ध करून देण्यात याव्या. तीन महिन्यानंतर या कामाचा आढावा घेण्यात येईल. नूतनीकरणानंतर तेथे काय-काय मशिनरी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, याचाही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी दिले. यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. सर्व सोयी उपलब्ध करून दिल्यानंतर महानगरपालिका आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संयुक्त विद्यमाने ते संचालित करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.