Published On : Sun, Oct 15th, 2017

वीज वाहिन्यांवरील वेली काढण्यात हयगय

Advertisement

नागपूर: खापा आणि पारशिवनी परिसरातील महावितरणच्या ११ केव्ही आणि ३३ केव्ही वीज वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात वेली वाढल्या असून त्या काढण्यास हयगय केल्याचे निदर्शनास आल्याने तेथील सर्व संबंधित अभियंते आणि तांत्रिक कर्मचा-यांवर तात्काळ प्रभावाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी संबंधित अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

खापा आणि पारशिवनी परिसरातील वीज वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याच्या आणि परिसरातील वीज वाहिन्या वारंवार ट्रीप होत असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या होत्या. मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी या तक्रारींची गांभिर्याने दखल घेत शनिवारी या भागाला अकस्मित भेट देली. यावेळी तेथील ११ केव्ही आणि ३३ केव्ही वीज वाहिन्यांची पाहणी केली असता त्यावर मोठ्या प्रमाणात वेली चढल्या असल्याचे आढळून आले. याबाबत तेथील उपकार्यकारी अभियंते, सहाय्यक अभियंते आणि लाईनस्टाफ़ला जाब विचारला असता सर्वजण निरुत्तर होते. झाल्या प्रकाराची गंभीर दखल घेत रफ़ीक शेख यांनी वीज वाहिन्यांवर वेली वाढल्या असतांना त्या काढून टाकण्याच्या कामात हयगय करणा-या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता तसेच सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

या अनुषंगाने नागपूर परिमंडलातील सर्व ११ केव्ही आणि ३३ केव्ही वीज वाहिन्यांवर वाढलेल्या वेली येत्या दिवाळीपुर्वी काढण्याचे निर्देशही मुख्य अभियंता यांनी परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंता यांना दिले असून दिवाळीनंतर लगेच परिमंडलातील विशेष पथक याबाबत विविध ठिकाणी भेटी देणार आहेत, या भेटीत त्यांना तेथील ११ केव्ही आणि ३३ केव्ही वाहीनीवर वाढलेल्या वेली आणि उघड्या वीज वितरण पेट्या (डीपी) आढळल्यास तेथूनच या प्रकाराचे छायाचित्र घेऊन संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे पाठविले जाईल. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी संबंधित उपविभागिय अभियंता, शाखा अभियंता आणि लाईनस्टाफ़ यांचेवर त्याचदिवशी कारवाई करण्याचे निर्देशही मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी दिले असून कार्यकारी अभियंता यांनी सदर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित कार्यकारी अभियंता यांचेवरही अधीक्षक अभियंता यांनी तात्काळ प्रभावाने कारवाई करण्याचे निर्देशही रफ़ीक शेख यांनी दिले आहेत.

दिवाळसणात वीज ग्राहकांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांचा वीजपुरवठा दर्जेदार आणि अंखंडित असावा यासाठी शक्यतोवर त्या सर्व उपाययोजना करण्याबाबतच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.