Published On : Wed, Jun 23rd, 2021

विजय वडेट्टीवार यांनी ओ.बी.सी.चा केला विश्वासघात, तात्काळ राजीनामा द्या

Advertisement

वक्तव्य देण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घ्यावी : आ.कृष्णा खोपडे

नागपूर : ओ.बी.सी. चा निर्णय होणार नाही, जनगणना होणार नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येणार नाही, असे नुकतेच वक्तव्य राज्याचे मंत्री व कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. काय झाले, शेवटी यांच्या वक्तव्याला केराची टोपली दाखवित सरकारने स्थानिक संस्थेच्या निवडणुका जाहीर करण्याची सहमती दिली. यापूर्वी सुद्धा लॉकडाऊन संदर्भात अशाच प्रकारची लगीनघाई वडेट्टीवार यांनी दाखविली होती.

तेव्हा देखील स्वत:चा फज्जा करवून घेतला. त्यामुळे यापुढे वडेट्टीवार यांनी कोणतेही वक्तव्य देण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घ्यावी. यापूर्वी नितीन राऊत यांनी सुद्धा अनेकदा आपला आपला हशा करवून घेतला. कारण सरकारमध्ये कॉंग्रेसचे किती वजन आहे, हे आता दिसून येत आहे. अशी घणाघाती टीका आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

स्वत:ला ओ.बी.सी. चे नेते म्हणवून घेणारे वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे वागू शकले नाही. दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही. आता ओ.बी.सी. बद्दल थोडी तरी आपुलकी शिल्लक असेल तर तात्काळ राजीनामा देऊन ओ.बी.सी. समाजासाठी संघर्ष करा, असा सल्ला आमदार कृष्णा खोपडे यांनी वडेट्टीवार यांना दिला आहे. परंतु कॉंग्रेसच्या परंपरेनुसार ते राजीनामा देणार नाहीच, कारण केवळ भा.ज.प. चा विरोध म्हणून ते सत्ताढकल करीत आहे. जनतेच्या हिताची कॉंग्रेसला कोणतीही चिंता नाही. असेही आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.