नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपद व कार्यकारिणीच्या निवडणुकीत आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आरोप पूर्णतः निराधार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण देत, अशा बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे ठामपणे सांगितले.
गडकरी यांनी म्हटले की, साहित्य संस्था या स्वायत्त असाव्यात आणि त्यामध्ये राजकारणी, व्यावसायिक किंवा साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये, हा आपला ठाम दृष्टिकोन आहे.
त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक प्रक्रियेशी आपला संबंध जोडण्याचा प्रश्नच येत नाही.
आपण विदर्भ साहित्य संघाचे केवळ हितचिंतक असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करणे एवढीच आपली भूमिका आहे. विद्यमान वास्तूच्या जागी साहित्य आणि नाट्य चळवळींसाठी अधिक सुसज्ज व उपयुक्त इमारत उभारावी, असे आपले वैयक्तिक मत पूर्वीपासून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वास्तूमध्ये साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांनाच प्राधान्य दिले जावे, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे तसेच ज्येष्ठ साहित्यिकांचा योग्य सन्मान व्हावा, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या सर्व उमेदवारांशी आपले सौहार्दपूर्ण वैयक्तिक संबंध असल्याचे सांगत, निवडणूक न होता सर्वानुमते अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड व्हावी, असे मत त्यांनी मांडले. विदर्भातील साहित्य चळवळीला नवी दिशा देणारी व सकारात्मक वातावरण निर्माण करणारी कार्यकारिणी निवडली जावी, असेही त्यांनी अधोरेखित केले.
विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वानुमते निर्णय होणे ही आदर्श बाब ठरेल, असे नमूद करत गडकरी यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









