Published On : Mon, Mar 16th, 2020

Video: नागपुरात कुख्यात वसीम चिऱ्या टोळीचा हैदोस: फायरिंग

Advertisement

नागपूर : कुख्यात गुंडांच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाचा भडका उडाल्यामुळे रविवारी रात्री बंगाली पंजा भागात फायरिंग, हाणामारी आणि तोडफोडीची घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे बंगाली पंजा भागात रविवारी रात्रीपासून निर्माण झालेला तणाव सोमवारी दिवसभर तसाच होता.

पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार. कुख्यात वसीम चिऱ्या टोळीचा गुंड मोहसीन रविवारी रात्री एका साथीदारासह मस्कासाथ भागात गेला होता. तेथे त्याच्या विरोधी गटातील अवेजने मोहसीनची बेदम धुलाई केली. मोहसीन आणि त्याचा साथीदार तेथून कसाबसा सटकला. त्याने वसीम चिºयाला हा प्रकार सांगितला.

त्यामुळे रात्री ११ च्या सुमारास शांतिनगर, लकडगंज भागातून वसीम चिरा, तर जाफरनगरातून शेख दानिश, मोहसीन अकोलाचा भाऊ, वसीम दोसा, शेख अस्सू, सानू मोमिनपुरा त्याच्या २० ते २५ साथीदारांसह तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगाली पंजा भागात धडकले. त्यांच्याकडे तलवार, चाकू, रॉड, दंडुके, गुप्ती असे घातक शस्त्र होते तर, कुख्यात वसीम चिराजवळ पिस्तूल होते. त्यांनी अवेजच्या घराजवळ येऊन आरडाओरड शिवीगाळ सुरू केली. कॉर्पोरेशन शाळेजवळ राहणारे गुलाम रसूल जमाल पोटीयावाला (वय ४७) यांना शिवीगाळ करून ‘आज तेरा गेम करना है’ असे म्हणत त्यांच्या दिशेने पिस्तुलातून फायर केले. गुलाम आडवेतिडवे पळत सुटल्याने त्यांना गोळी लागली नाही.

त्यानंतर आरोपींनी परिसरात तोडफोड सुरू केली. त्यांच्या दोन दुचाकी, एक नॅनो कार तसेच परिसरातील नागरिकांच्या सुमारे १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. बंगाली पंजा चौकातील इरफानच्या भावाचा भोलाशहा पान महल आहे. त्याचीही आरोपींनी तोडफोड केली. पुढे जाऊन वसीम चिºयाने आणखी चार फायर केले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशत आणि तणाव निर्माण झाला.

माहिती कळताच तहसील ठाण्याचा पोलीस ताफा तसेच पाचपावली आणि लकडगंजमधील गस्ती पथक, गुन्हे शाखेचे पोलिसही पोहचले. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनीही धाव घेतली. पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांनी आरोपींची शोधाशोध केली, मात्र एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.