नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत जे घडले त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये आणि तीन प्रमुख पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे काम केले जात आहे. त्याअंतर्गत मंगळवारी नागपुरात पूर्व विदर्भ महायुती समन्वय बैठक झाली. बैठकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरातील साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये बांधण्यात आलेल्या हॉलमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते अनिल तटकरे, तिन्ही पक्षांचे नेते, आमदार, खासदार आणि अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडीने खोट्याच्या जोरावर लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवू.
जात-धर्म सोडून महायुतीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार. एवढेच नाही तर या योजना बंद पाडण्याचे कारस्थान करणाऱ्यांना धडा शिकवू, असे मुनगंटीवार म्हणाले.