
नागपूर – सोनेगाव पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणातील दोन तरुणांना अटक करून १ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईनंतर परिसरातील वाहनचोरांचा धसका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते २८ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत, जयकारा सोसायटी, सोनराळ, नागपूर येथून रॉयल एनफिल्ड बुलेट (MH-49-AD-6333) ही काळ्या रंगाची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
तक्रारीनंतर तपासाच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक युवराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश गाडगे यांनी तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पोलिसांनी सौरव दिनेश गोडे (२२, घाटंजी, यवतमाळ) आणि त्याचा साथीदार धनराज अजय अक्कलवार (१९, घाटंजी, यवतमाळ) यांना अटक केली.
चौकशीत आरोपींनी आणखी एका होंडा शाईन (TS-13-EN-9029) या काळ्या रंगाच्या मोटारसायकलीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही गाडी एअरपोर्ट परिसरातील आमराई भागात झाडाखाली लपवून ठेवली आहे. पोलिसांनी तातडीने छापा टाकून सदर गाडी ताब्यात घेतली.
याशिवाय पोलिसांनी आणखी दोन वाहने — होंडा शाईन सिल्व्हर रंगाची (MH-29-CE-4736) आणि रॉयल एनफिल्ड बुलेट (MH-49-AD-6333) — अशी एकूण तीन दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या या मालाची किंमत अंदाजे ₹१.१० लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पोलीस अधिकारी कारटकर, पोहवा राजेश (ब.नं. 3190) आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता. पुढील तपास सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोहवा मंगेश गाडगे करीत आहेत.










