Published On : Sat, Jun 6th, 2020

वेकोलिने कोलमेड मिथेनमधून सीएनजी तयार करावा : नितीन गडकरी

-वेकोलिच्या 3 कोळसा खाणींचे ई-उद्घाटन
-कोल गॅसिफिकेशनमधून युरिया मिळावा
-ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव- राज्य शासनाने शिफारस करावी
-भूमिपूत्रांना रोजगारासाठी प्राधान्य
-धापेवाड्याला पर्यटनाच्या दृष्टीने योजना आखावी

नागपूर: वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या बल्लारशहा चंद्रपूर येथील दोन कोळसा ब्लॉक कोल गॅसिफिकेशनसाठी आहेत. गॅसिफिकेशच्या माध्यमातून युरिया तयार करण्यात यावा, तसेच राणीगंज येथे कोलमेड मिथेन तयार करण्यात आले आहे. तसेच या कोळसा खाणीतूनही तयार करण्यात यावे. त्यामुळे विदर्भ आणि विदर्भालगत मध्यप्रदेशच्या काही भागाला सीएनजी उपलब्ध होईल व डिझेल-पेट्रोलचा वापर कमी होईल, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व लघुमध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

गडकरी यांनी आज त्यांच्या निवासस्थानाहूनच वेकोलिच्या आदासा, मध्यप्रदेशातील शारद, ढकासा अशा तीन कोळसा खाणीच्या उत्खननाचे ई-उद्घाटन केले. आजपासून या खाणींचे उत्खनन सुरु झाले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आ. आशिष जयस्वाल, खा. कृपाल तुमाने व अन्य आमदार ऑनलाईन या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

याप्रसंगी गडकरी यांनी आपल्या भाषणातून कोलमेड मिथेनमधून सीएनजी तयार करण्यात यावा, तसेच युरिया तयार करण्यात यावा यावर अधिक भर दिला. युरिया तयार झाला तर शेतकर्‍यांना स्वस्त किंमतीत युरिया उपलब्ध होईल व ओमानमधून युरियाची आयात कमी करावी लागेल असे ते म्हणाले. राणीगंज येथे सीएनजी तयार करून लोकांना उपलब्ध करण्यात आला आहे. तसाच सीएनजी या तीन खाणीच्या माध्यमातून निर्मित झाला तर विदर्भ आणि मप्रचा विदर्भालगतच्या परिसराचा यामुळे विकास होईल, असेही ते म्हणाले.

तसेच कोळसा खदानीतून निघणार्‍या रेतीचा व्यवहार पारदर्शक असावा. ही रेती शासकीय संस्थांना देण्यात येत आहे, ही चांगली बाब आहे. पण अनेकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रेतीची अधिक गरज असते, त्यांनाही ती उपलब्ध व्हावी. ही रेती रॉयल्टी देऊन सर्वांसाठ़ी खुली केली तर गरीबांना स्वस्तात रेती उपलब्ध होईल व पंतप्रधान आवास योजनेच्या कामासाठीही ती स्वस्तात उपलब्ध होईल. रेती माफीयांना पायबंद बसेल. यासाठी वेकोलिने देशाच्या स्तरावर रेतीसाठी एक धोरण तयार करावे, असेही ते म्हणाले.

गेल्या 6 वर्षात कोळसा उत्पादन वाढल्याबद्दल वेकोलिचे अभिनंदन करून ते म्हणाले- 20 नवीन खाणी सुरु होत आहेत. यापैकी 3 खाणींचा आज शुभारंभ झाला. 5300 कोटी रुपये यात गुंतवण्यात आले असून आतापर्यंत 5200 पेक्षा अधिक भूमिपूत्रांना रोजगार देण्यात आला. भूमिपुत्रांनाच रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावे. कोळसा खाणींमधील कोळशाचा दर्जा सुधारला जावा. मध्यंतरी कोळशातून दगड येण्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींकडे लक्ष देऊन दर्जा अधिक सुधारण्याचा प्रयत्न वेकोलिने करावा असेही गडकरी म्हणाले.

कोराडी-खापरखेडा वीज केंद्राला सांडपाणी पुरवून महापालिकेचे उत्पन्न वाढविणारी ही देशातील पहिली घटना आहे. यामुळे पेंचचे चांगले पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच आदासा कोळसा खाणीजवळ धापेवाडा गावाच्या पर्यटनाच्या दृष्टीने वेकोलिने योजना तयार करण्याची सूचना गडकरींनी केली.

ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव नागपूर मेट्रोने महाराष्ट्र शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाची शिफारस करून केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवावा अशी विनंती गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली. ब्रॉडगेज मेट्रो वडसा-नरखेड, नरखेड ते चंद्रपूर, चंद्रपूर गोंदिया आणि बडनेरा ते गोंदिया अशी धावणार आहे, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले. याप्रसंगी केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी, मप्रचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी केले.