Published On : Sat, Jun 16th, 2018

आंबेडकरांच्या नावामागे ‘महाराज’ जोडल्याने वादंग

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यवाहक रजिस्ट्रारने आंबेडकरांच्या नावामागे ‘महाराज’ शब्द जोडल्याने या रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे. सिनेटच्या बैठकीत सदस्यांनी हंगामा केल्यानंतर कुलगुरुंना ही कारवाई करावी लागली.

साधना पांडे असं या कार्यवाहक रजिस्ट्रारचं नाव आहे. सिनेट सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी पत्रकारही उपस्थित होते. या बैठकीला संबोधित करताना पांडे यांनी आंबेडकरांच्या नावामागे ‘महाराज’ शब्द जोडला. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या सिनेट सदस्यांचा पारा चढला आणि त्यांनी बैठकीत प्रचंड गोंधळ घातला.

पांडे यांनी हेतूपुरस्सर आंबेडकरांच्या नावामागे ‘महाराज’ हा शब्द जोडला असून त्या उजव्या विचारसरणीच्या असल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी सिनेट सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे कुलगुरू बी. चोपडे यांनी अखेर पांडे यांना निलंबित केले.