Published On : Fri, Sep 7th, 2018

गोवर व रुबेलाच्या उच्चाटनासाठी १४ नोव्‍हेंबरपासून लसीकरण मोहीम

नागपूर : गोवर व रूबेला या रोगांच्या उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्यावतीने येत्या १४ नोव्‍हेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहीमे अंतर्गत नागपूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा तसेच शासकीय व खाजगी शाळांमधील इतर 9 महिने ते 15 वर्ष पर्यंतच्या सर्व मुलांना एम.आर. लस देण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ७) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात गोवर व रूबेला लसीकरणासंबंधी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

बैठकीत अपर आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी अनिल चिव्हाणे, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सजिद खान, नोडल अधिकारी डॉ. सुनिल घुरडे, डॉ. नंदकिशोर राठी, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहीरवार, शिक्षणाधिकारी सौ.चरडे, सौ. आमटे, लॉयन्स कल्बचे अध्यक्ष बलवीरसिंह वीज, समन्वयक दिपाली नागरे तसेच दहाही झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


गोवर या आजारामुळे न्यूमोनिया व मेंदूज्वर या सारखे दुष परिणाम होतात तसेच रुबेला या आजारामुळे मातेला पहिल्या त्रिमाहित बाधा झाल्यास, बालकाला मेंदूविकार, मोतीबींदू, बहिरेपणा तसेच ह्रदयविकार यासारखे दुष्परिणाम होवू शकतात. या रोगांच्या गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

या लसीमुळे गोवर व रुबेला या आजारामुळे बालकांना होणारे दुष ‍परिणाम टाळता येवू शकतील. मनपाच्या दहाही झोनमध्ये ही मोहिम राबविण्या येत असून यामध्ये आरोग्य विभाग, ‍शिक्षण विभाग, शासकीय विभाग, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, बाल विकास प्रकल्प, आयएमए, आयएपी व इतर विभागांचा समावेश राहणार आहे. गोवर व रूबेला रोगांपासून दूर राहण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.