Published On : Fri, Sep 24th, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात 70 शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लसीकरण

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या पुढाकाराने आयोजित लसीकरण मोहिमेत 70 शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

बचत भवनातील लसीकरण शिबीरात 70 शासकीय-अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी लसीकरण केले असून यामध्ये 32 पुरुष व 38 महिलांनी लाभ घेतला आहे. यामध्ये पहिला डोस 45 व्यक्तींनी तर दुसरा 25 व्यक्तींनी घेतला असून 18 ते 45 वयोगटातील -50, 45 ते 60 वयोगटातील- 19 तर 60 नंतरच्या एका व्यक्तीने लसीकरण करवून घेतले.

ज्यांचे लसीकरण प्रलंबित आहे, अशा सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार शासकीय कार्यालयात देखील लसीकरण मोहीम वेगवान झाली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत 61 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण करण्यात आले.

गेल्या मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी महिला विशेष लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सूचविल्याप्रमाणे 330 केंद्राद्वारे महिलांची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये 22 हजार महिलांनी लसीकरण केले आहे. नागपूर शहरात 19 सप्टेंबरपर्यंत 19 लाख 11 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 13 लक्ष 13 हजार तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 5 लक्ष 97 हजार एवढी आहे.

नागपूर ग्रामीण भागात 19 सप्टेंबरपर्यंत तालुका निहाय भिवापूर- 58 हजार 506, हिंगणा- 1 लक्ष 56 हजार 432, कळमेश्वर- 99 हजार 955, कामठी- 1 लक्ष 50 हजार 97, काटोल- 1 लक्ष 7 हजार 156, कुही- 65 हजार 694, मौदा- 87 हजार 607, नागपूर ग्रामीण- 1 लक्ष 65 हजार 576, नरखेड- 96 हजार 7, पारशिवनी 91 हजार 742, रामटेक- 76 हजार 621 सावनेर- 1 लक्ष 51 हजार 206, उमरेड- 1 लक्ष 39 हजार 911 एकूण 14 लक्ष 46 हजार 510 नागरिकांचे लसीकरण झाले होते.

काल दिनांक 23 सप्टेंबर रोजी 12 रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी कोविड सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.