Published On : Wed, May 30th, 2018

पंजाब-हरियाणाच्या धर्तीवर राज्यात ब्रँडिंग व मार्केंटिंग कार्यप्रणालीचा वापर करणार – सुभाष देशमुख

Advertisement

मुंबई: मार्केटिंग फेडरेशन, कृषी मंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ यांनी एकत्रित येऊन पंजाब हरियाणाच्या धर्तीवर राज्यात ॲग्रो-प्रोसेसिंग, ब्रँडिंग व मार्केंटिंग कार्यप्रणालीचा वापर करून याद्वारे राज्यातील खरेदी विक्री संघ, शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचत गट व वि.का.स. सोसायट्यांचे सक्षमीकरण करणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्थांच्या सक्षमीकरणासंदर्भात पंजाब-हरियाणा दौरा सादरीकरणासंदर्भात श्री.देशमुख यांच्या दालनात आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, विदर्भ पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. हरिबाबु तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री देशमुख म्हणाले, पंजाब, हरियाणा येथील मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्था यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. कडधान्य,तेलबिया,गहू, तांदूळ यापासून विविध प्रकारची तयार केलेली उत्पादने जागतिक स्तरावर पोहचली आहेत. त्यांनी अन्नधान्य खरेदी बरोबर, कृषी निविष्ठा पुरवठा, अग्रो-प्रोसेसिंग, ब्रँडींग व कृषी उत्पादनांचे मार्केंटिंग असे विविध व्यवसायिक उपक्रम राबविले आहेत.

महाराष्ट्र्रातील कृषी उत्पादनांची विविधता बघता या पद्धतीचा अवलंब केल्यास मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्थांच्या माध्यमातून कृषी उत्पादने जागतिक स्तरावर पोहचू शकेल . व या माध्यमातून सभासद संस्था अधिक सक्षम होईल असा विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केला.

याकरिता पंजाब-हरियाणा राज्याच्या मार्केंटिंग फेडरेशन बरोबर सामंजस्य करार (MOU) करण्याची कार्यवाही तत्काळ करुन महाराष्ट्रातील कृषी उत्पादने इतर राज्यात कशी जातील, याचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्याची कार्यवाही तात्काळ करावी व त्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मदत घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पंजाब, हरियाणा अभ्यास दौऱ्याचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले.