Published On : Mon, Dec 20th, 2021

गंजीपेठ येथे भारतमातेच्या म्यूरलचे अनावरण

Advertisement

नागपूर : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. नागपूर शहरामध्येही याच अनुषंगाने स्वातंत्र्याचा जागर सुरू असून देशाभिमान बाळगणारे अनेक कार्य सुरू आहेत. त्याच संकल्पनेतून भारतमातेचे म्यूरल साकारण्यात आले आहे. भारतमातेचे हे म्यूरल शहरातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून प्रभाग १९ मधील राजवाडा हॉलच्या जवळ गंजीपेठ येथे भारतमातेचे म्यूरल साकारण्यात आले आहे. या म्यूरलचे रविवारी (ता.१९) महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रांत संचालक राजेश लोया यांच्या हस्ते अनावरण झाले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, विद्या कन्हेरे, किशोर पालांदूरकर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, यापूर्वी प्रभाग १९ मध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा म्यूरल महापौरांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या प्रभागात तीन एकर जागेत वंदे मातरम उद्यानाची निर्मिती केली जात आहे. या उद्यानात देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांची माहिती दिली जाईल. तसेच मुलांना आणि मुलींना योग, काठी- दंड चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी योगाचे प्रात्यक्षिक दाखवणारे मुलांचे मनभरून कौतुक केले.

संघाचे महानगर प्रांत संचालक राजेश लोया यांनी भारतमातेच्या म्यूरल बाबत महापौरांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, पुढील पिढीला भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर नेत्यांची माहिती असणे आवश्यक आहे. या माध्यमातून त्यांच्यामध्ये नवीन चेतना निर्माण होईल.

उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी नागपूर जिल्हा योग असोसिएशनच्या सहकार्याने यूनिटी स्पोर्ट्स आणि अमित स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अनिल मोहगांवकर, भूषण टाके, सिध्दार्थ खरे, अभिजीत गोडे, पूर्वा मिरे, ऋषीकेश बागडे, रजत मोहगांवकर, पूजा खडसे, संदेश खरे यांनी विविध योग प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन बृजभूषण शुक्ल यांनी केले. आभार अजय गौर यांनी मानले.