Published On : Wed, Apr 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सिताबर्डीत दुकानफोडी प्रकरणाचा उलगडा; तरुण आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : शहरातील गजबजलेल्या सिताबर्डी परिसरात घडलेल्या दुकानफोडीच्या मालिकेचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणातील एका तरुण आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास माया मोबाईल शॉपसह शेजारील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी तब्बल ७० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यामध्ये रोख रक्कम तसेच मोबाईल अ‍ॅक्सेसरीजचा समावेश होता.

या प्रकरणी बंजारी नगर येथील व्यावसायिक कमलेश मोहनानी (वय ४४) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सिताबर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत सुमित महावीर सुमन (वय १९, रा. सदर) याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून ४५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

या गुन्ह्यात सहभागी असलेला संतोष उर्फ कालू नागदिवे हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त मुलीचाही या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात अनिकेत सोनवणे व त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, फरार आरोपी अटकेत आल्यानंतर उर्वरित मुद्देमालही जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.