Published On : Fri, Mar 5th, 2021

स्थायी समिती सभापतीपदी प्रकाश भोयर यांची अविरोध निवड

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रकाश भोयर यांची शुक्रवारी (ता.५) अविरोध निवड झाली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्थायी समिती सभापतीच्या निवडीची प्रक्रीया पार पाडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती पदासाठी गुरूवारी (ता.४) नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. विशेष म्हणजे या पदासाठी भारतीय जनता पक्षाचे एकमेव उमेदवार प्रकाश भोयर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यामुळे प्रकाश भोयर यांची स्थायी समिती सभापतीपदी अविरोध निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली.

स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्‍हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून पार पाडली. यावेळी मावळते स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, स्थायी समिती सदस्य सर्वश्री संजय बालपांडे, प्रमोद कौरती, अनिल गेंडरे, राजेश घोडपागे तसेच सदस्या सुषमा चौधरी, प्रगती पाटील, भारती बुंडे, नेहा निकोसे, खान नसीम बानो मो. इब्राहिम आदी उपस्थित होते.