Published On : Wed, Dec 29th, 2021

विद्यापीठ शिक्षण मंचाचे द्विदिवसीय अभ्यास वर्ग संपन्न

Advertisement

नागपूर : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, विद्यापीठ शिक्षण मंच द्वारा आयोजित दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्गाचा समारोपीय कार्यक्रम आज दिनांक 28 डिसेंबरला 2021 ला संपन्न झाला. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ कल्पनाताई पांडे, प्रमुख अतिथी माजी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, विशेष अतिथी डॉ संजय दुधे, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर आणि डॉ संजय कवीश्वर, अधिष्ठाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, डॉ प्रशांत माहेश्वरी, अधिष्ठाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आणि डॉ सतीश चाफले, महामंत्री विद्यापीठ शिक्षण मंच हे प्रामुख्याने उपस्थित होते.

समारोपीय कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ कल्पनाताई पांडे म्हणाल्या की, विद्यापीठ प्राधिकरणाच्या ज्या निवडणुका येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या आहेत त्यात विद्यापीठ शिक्षण मंचाने विद्यापीठात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे दोन दिवसीय निवासी शिबीर शिवतीर्थ स्थळी आयोजित करण्यात आले होते.

आजवर विद्यापीठ मंचाने विद्यापीठात महत्त्वाचे सर्वोच्च पद पटकावले आहे, पण आज आपण तेवढ्यावर सीमित न राहता विद्यापीठ मंचाने सर्वच प्राधिकरणावर आपले स्थान मिळवावे हा या दोन दिवसीय निवासी शिबिराचा हेतू असल्याचे स्पष्ट केले.

‘विद्यापीठाच्या निवडणुका : प्रचार आणि प्रसार’ या विषयावर भाष्य करताना डॉ संजय दुधे, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी विद्यापीठाच्या महत्त्वाच्या प्राधिकरणाच्या निवडणुकीची बांधणी करण्याकरिता आपण जोमाने कसे कार्याला लागले पाहिजे आणि सर्व प्राध्यापकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या पक्षात सामील करून जास्तीत जास्त संख्येने आपण निवडून कसे येऊ याविषयी मोर्चाबांधणी केली पाहिजे, असे मत मांडले. डॉ प्रशांत माहेश्वरी यांनी संघटन कौशल्याबद्दल आपले मत व्यक्त केले, तर डॉ संजय कवीश्वर यांनी विद्यापीठाच्या सर्वच प्राधिकरणामध्ये आपल्या मंचाचा झेंडा फडकवावा याकरिता आतापासूनच रणनीती आखून कार्य केले पाहिजे, असे वक्तव्य केले.

या अभ्यास वर्गाचे दोन दिवसीय अनुभव व्यक्त करताना डॉ रतिराम चौधरी यांनी मंचाकरिता प्रत्येक प्राध्यापकाची सकारात्मक बांधिलकी आहे त्यातूनच येणाऱ्या काळात सर्वच प्राधिकरणावर विजय होईल असा आशावाद व्यक्त करून हे दोन दिवशीय प्रशिक्षण प्रत्येक प्राध्यापकांच्या जीवनात किती अविस्मरणीय ठरले याविषयी भाष्य केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ सोपानदेव पिसे, यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सतीश चाफले, महामंत्री विद्यापीठ शिक्षण मंच यांनी मानले.