नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. हे अंतरिम बजेट असले तरी सर्वसामान्यांसाठी खास असल्याच्या चर्चा आहेत. महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी या बजेटमध्ये मोठी घोषणा होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मोदी सरकारच्या 2.0 मधील या शेवटच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
सरकारची सर्वव्यापी विकासाच्या दिशेने वाटचाल –
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, विकास कार्यक्रमांनी सर्वांसाठी घरं, प्रत्येक घरासाठी पाणी, सर्वांसाठी वीज, सर्वांसाठी स्वयंपाकाचा गॅस आणि सर्वांसाठी बँक खाती विक्रमी वेळेत या माध्यमातून प्रत्येक घर आणि व्यक्तीला लक्ष्य केलं आहे. आमचं सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेनं काम करत आहे. आपल्या तरुण देशाच्या आकांक्षा उच्च आहेत, वर्तमानात अभिमान आहे आणि उज्ज्वल भविष्याबद्दल आशा आणि विश्वास आहे. गेल्या 10 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व बदल झाले आहेत. 2014 मध्ये देशासमोर मोठी आव्हानं होती. सरकारने त्या आव्हानांवर मात केली आणि संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत.