Published On : Fri, Mar 24th, 2017

पुन्हा त्याच विमानाने प्रवास करणार, मला अडवून दाखवावं – गायकवाड

Advertisement


मुंबई
: खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केलेलं प्रकरण वाढलं आहे. एअर इंडियाने ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आता फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनेही शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासाला मनाई केली आहे. “पण संध्याकाळी पुन्हा एअर इंडियाच्या विमानाने जाणार आहे, त्यांनी मला अडवून दाखवावं,” असं आव्हान रवींद्र गायकवाड यांनी दिलं आहे. यामुळे हे प्रकरण अधिक वाढण्याची शक्यता आहे.

खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांना ब्लॅक लिस्ट केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्समध्ये जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईसजेट यांचा समावेश आहे. त्यामुळे आता रवींद्र गायकवाड यांना या विमानातून प्रवास करता येणार नाही. मात्र असे असले तरीही त्यांनी एअर लाईन्स कंपन्यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, ब्लॅक लिस्ट केल्यानंतर रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाला इशारा दिला आहे. रवींद्र गायकवाड म्हणाले की, “आज संध्याकाळी ४.१५ वाजता मी पुन्हा एअर इंडियाच्या विमानाने जाणार आहे. त्यांनी मला अडवून दाखवावं.” “मी काहीही चुकीचं केलं नाही. त्यांनी चुकीचं केलं. त्यांनी माझ्याशी भांडण केल्यानंतरच मी मारहाण केली. मला याबद्दल जराही पश्चात्ताप नाही आणि मी माफीही मागणार नाही. जर त्यांनी यापुढेही असं केली, तर मीही पुन्हा असंच करेन. मी एअर इंडियाच्या संध्याकाळच्या विमानाने परत जात आहे. बघतोच मी ते मला कसे अडवतात. त्यांनी मला ब्लॅक लिस्ट करुन तर दाखवावं,” असं रवींद्र गायकवाड म्हणाले.