Published On : Mon, Dec 17th, 2018

२२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याचे ‘यूजीसी’चे निर्देश

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये अनेकदा प्रशासनाने निर्देश दिल्यानंतर अनिवार्य उपक्रम किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत उदासीनता दाखविण्यात येते. २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहे. गणिताचे महत्त्व लक्षात घेता महाविद्यालये विद्यार्थी हित लक्षात घेता यासंदर्भात पुढाकार घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२२ डिसेंबर १८८७ साली तामिळनाडूतील इरोड येथे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. रामानुजन यांनी ‘मॅथेमॅटिकल अ‍ॅनालिसिस’, ‘नंबर थिअरी’, ‘इन्फायनाईट सिरीज’ आणि ‘कन्टिन्युईड फ्रॅक्शन्स’ या मुद्यांवर मौलिक योगदान दिले होते. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी २२ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित करण्यात आला. या दिवशी सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालये यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.

गणिताबाबत आवड, जागृती निर्माण करण्यासाठी तसेच ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट, रामानुजन यांच्या कर्तृत्वाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी ‘सेमिनार’, व्याख्यान यांचे आयोजन करावे, यासाठी देशातील विविध शिक्षणतज्ज्ञ, संशोधक यांना बोलविण्यात यावे, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आली आहे. सोबतच प्रश्नमंजुषा, ‘पोस्टर प्रेझेंटेशन’सारख्या स्पर्धांचेदेखील आयोजन करता येईल.

यासाठी भारतीय गणित, आयुष्याचे गणित किंवा गणिताचे प्रत्यक्ष ‘अप्लिकेशन्स’ यासारख्या ‘थीम्स’ ठेवाव्यात, असेदेखील विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सांगण्यात आले आहे. साधारणत: विद्यापीठ अनुदान आयोग किंवा नागपूर विद्यापीठ यांच्या निर्देशांचे महाविद्यालयांनी पालन करावे, असे अपेक्षित असते. मात्र निर्देशांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करणारी यंत्रणाच विद्यापीठात नाही. त्यामुळे सर्रासपणे बहुतांश महाविद्यालयांकडून निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. अशा स्थितीत राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम महाविद्यालयांत साजरा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यापीठाकडून अद्याप निर्देश नाहीत
आश्चर्याची बाब म्हणजे नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर गणित विभाग तसेच विविध संलग्नित महाविद्यालयांत गणित शिकणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. याशिवाय अभियांत्रिकीमध्येदेखील गणित शिकविण्यात येते. असे असतानादेखील विद्यापीठाने कुठलेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत.