
नागपूर : शिवसेना (उभयपक्ष) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्र सरकारवर निशाणा साधत “राज्य सरकारने मदतीसाठी प्रस्तावच पाठवला नाही” असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करत टोला लगावला आहे.
“जर खरंच राज्याकडून प्रस्ताव गेला नसेल, तर मग केंद्राचं पथक महाराष्ट्रात मदतीसाठी आलं कसं? उद्धव ठाकरेंना फक्त मीडियामध्ये चर्चेत राहायचं आहे, म्हणूनच ते अशा निरर्थक टिप्पणी करतात,” अशी टीका बावनकुळे यांनी केली.
केंद्र शेतकऱ्यांसोबत ठाम उभं-
बावनकुळे म्हणाले, “केंद्राकडून पाठवलेले अधिकारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. सर्वेक्षणानंतरच मदतीचा निर्णय घेतला जातो. शेतकऱ्यांना चुकीचे धनादेश मिळाल्याच्या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर निश्चितच कारवाई होईल. शेतकऱ्यांशी खेळ करणं कुणालाही शोभणारं नाही.”
आमदारांनी संयम ठेवावा-
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, “हे वर्ष शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आहे. निधी थोडा उशिरा मिळाला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व विषयांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त करण्याचं काही कारण नाही.”
तसंच राहुल गांधींवर हल्लाबोल करत ते म्हणाले, “राहुल गांधी प्रत्येक निवडणुकीनंतर सुटीसाठी विदेशात जातात. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखं एनडीएचं सरकार स्थापन होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पडोळेंचं वक्तव्य अपरिपक्व-
भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या वक्तव्यावर भाष्य करत बावनकुळे म्हणाले, “आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यातील साडेनऊ हजार कोटींचं वितरण सुरू आहे. अशावेळी पडोळे यांचं विधान पूर्णपणे गैरजबाबदार आणि अपरिपक्व आहे. ते अपघाताने खासदार झाले असून बोलताना त्यांना संयम पाळायला हवा.”
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाय-
पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलांचा मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, “ही अतिशय वेदनादायक घटना आहे. वाघ-बिबटे गावांमध्ये शिरकाव करत आहेत. नागपुरात जसं आम्ही कॅमेरे बसवले, तसेच उपाय मंचर परिसरातही केले जातील. वन विभागाने तत्काळ कार्यवाही करावी.”
पडोळेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला-
दरम्यान, खासदार प्रशांत पडोळे यांनी म्हटलं होतं, “शेतकऱ्यांना फक्त १८ रुपयांचा पीकविमा मिळाला आहे. धोरणं न बदलल्यास यावेळेस आम्ही आत्महत्या नाही करणार, पण तुम्हालाच उडवून देऊ.त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ माजली असून विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.









