
मुंबई – खासदार संजय जाधव यांनी केलेल्या “राष्ट्रवादीला दिलेलं मत म्हणजे भाजपलाच दिलेलं मत” या वक्तव्यावर भाजप जिल्हाध्यक्ष सुरज भुमरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी भुमरे यांनी विरोधकांसह उद्धव ठाकरे यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली.
सुरज भुमरे म्हणाले की, “संजय जाधव यांनी आजवर ‘खान की बाण’ अशा पातळीचं राजकारण केलं. पण आता जनता सुज्ञ झाली आहे. विकास कोण करू शकतो हे लोकांना समजलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक समाजाने मोठ्या प्रमाणावर भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे जनतेचा कल भाजपकडे वळलेला स्पष्ट दिसतो.”
ते पुढे म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत मुस्लिम समाजाचं मतदान मिळालं म्हणून काहींचं राजकारण यशस्वी झालं. मात्र नगरपालिका निवडणुकीत तसं झालं नाही. कारण मुस्लिम समाजाला आता हे स्पष्टपणे कळून चुकलं आहे की उद्धव ठाकरे पाच वर्षे घराबाहेरच पडले नाहीत. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला. याचाच परिणाम म्हणून नगरपालिकांमध्ये परभणी जिल्हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला,” असा दावा भुमरे यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत बोलताना भुमरे म्हणाले, “शिंदे गटाला किती जागा द्यायच्या आणि भाजपने किती जागांवर निवडणूक लढवायची, हे ठरवणं माझं काम नाही. याबाबतचा अंतिम निर्णय आजच होईल. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेश वरपूडकर सध्या वॉर्डनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहेत. भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे.”
दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती संभाजीनगर येथे महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेसह युतीबाबतची भूमिका स्पष्ट होणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं. “जागावाटपावर कोणताही अडथळा नाही. आज सगळं स्पष्ट होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.
याचवेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडली. “हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांचा अंतर्गत विषय आहे. शरद पवार यांनी आमच्याशीही चर्चा केली आहे. पुढे काय घडेल सांगता येणार नाही. मात्र अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले, तर शिवसेना त्यांच्यासोबत जाणार नाही,” असं दानवे यांनी स्पष्ट केलं.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापत असल्याचं चित्र आहे.








