मुंबई: पार्लमेंट ते पंचायत सत्ता हा उपक्रम राबवताना शिवसेना आणि एनडीएतील घटक पक्षांच्या सहकार्यामुळेच भाजपला आजचे जे सुवर्णयुग अवतरले आहे. भाजपने घटक पक्षांचे योगदाना कधीही विसरू नये अशा थेट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत पार्लमेंट ते पंचायत भाजपची सत्ता हवी असे अवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. शहांच्या या विधानावर ठाकरे यांनी दै. सामनातून जोरदार टीका केली आहे.
सुवर्णकाळ! व इतर बरेच काही! या मथळ्याखाली दै. सामनात लिहीलेल्या लेखात ठाकरे यांनी भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली आहे. सर्वच राज्यांत भाजपचेच राज्य हवे हा संकल्प चांगला व प्रेरणादायी आहे. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या ३३ पक्षांना ‘ताट व पाट’ दिले त्या पक्षांबाबत तुमचे धोरण काय? याच सर्व मित्रांच्या मदतीने आजचे सुवर्णयुग अवतरले आहे. शिवसेना, अकाली दल, तेलुगू देसमसारखे पक्ष आपापल्या राज्यात ताकदीने उभे आहेत. सत्तेत असो अगर नसो, शिवसेनेचा सुवर्णकाळ कधीच संपत नाही. सुवर्णकाळाचे निर्माते व साक्षीदार हे काळानुसार बदलत असतात, असे देशाचा इतिहास सांगतो, असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विधानावर ठाकरे यांनी चांगलेच टोले लगावले.
दरम्यान, हिंदुस्थानात कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता. त्याच देशात आता कोट्यवधी घरांतून चुलीचा धूरही निघत नाही हे वास्तव आहे, असा टोला लगावत ठाकरे यांनी सरकारे येतात व जातात. परिस्थिती फारशी बदलत नाही. उत्तर प्रदेशातील मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध सुसाट निघाला आहे व त्यास अडविण्याचा प्रयत्न करणारे देशाचे शत्रू ठरवले जात आहेत. ‘शतप्रतिशत’चा विचार चांगला असला तरी लोकशाहीत विरोधी सूर काढणारे देशाचे शत्रू ठरवले जाऊ नयेत. अशाने लोकशाहीचा उरलासुरला डोलाराही कोसळून पडेल, अशी भीतीही ठाकरे यांनी आपल्या लेखात बोलून दाखवली आहे.











