महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यातच शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसीची गरज नसल्याचं विधान केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याच्या वृत्ताला अधिक बळकटी मिळाल्याचं बोललं जावू लागलं. आघाडीत बिघाडी असल्याचे वृत्त समोर येत असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वातास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती समोर आलेली नाहीये पण महाविकास आघाडीमधील मतभेद आणि इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. राज्यात येत्या काळात महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याच दरम्यान महाविकास आघाडीत मतभेद झाल्याच्या वृत्ताने मविआत बिघाडी होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली. मात्र, भाजपसमोर मोठं आव्हान उभं करायचं असेल तर महाविकास आघाडीची वज्रमुठ घट्ट ठेवणे गरजेचे आहे.
आघाडीत बिघाडी?
उद्योगपती अदानी यांच्या प्रकरणात काँग्रेससह ठाकरे गटाने सुद्धा जेपीसी चौकशीची मागणी लावून धरली आणि त्यानंतर शरद पवारांनी मात्र, जेपीसीची गरज नसल्याचं म्हटलं. तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सुद्धा काँग्रेसकडून टीका होत असताना मात्र, अजित पवारांनी ईव्हीएम योग्य असल्याचं म्हटलं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या डीग्रीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले असताना राष्ट्रवादीने या विषयावर चर्चा करण्याची गरज नसल्याचं म्हटलं. या सर्व मुद्द्यांवरुन आघाडीत मतभेद आहेत का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.