Published On : Sun, May 31st, 2020

दोन गटात हाणामारी : सहा जखमी, नागपुरातील यशोधरानगरात तणाव

नागपूर : जुन्या वादातून यशोधरा नगरातील दोन गटात शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले. दोन्हीकडून परस्परविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कुंदनलाल गुप्ता नगर, शाहू मोहल्ला येथे राहणारा आकाश शाहू याने दिलेल्या तक्रारीनुसार, जुन्या वादातून त्याच्यावर शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी लितेश शाहू, मुकेश शाहू, बबलू शाहू, किंग शाहू तसेच कुणाल पवनीकर या पाच जणांनी रॉड तसेच पट्टीने हल्ला चढवला.

या हल्ल्यात आकाश शाहू, रजत थेटे, हर्षल आणि राजू बोकडे हे पाच जण जखमी झाले. प्रत्युत्तरात आकाश आणि त्याचे साथीदार हर्षल, राजा बोकडे यांनी हल्ला चढवून लीतेश रामचंद्र शाहू याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेतले. आकाशच्या तक्रारी वरून लितेश शाहू आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला तर लितेशच्या तक्रारीवरून आकाश शाहू आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सुरू आहे.