
नागपूर – खापरखेडा परिसरातील बिना संगम येथे रविवारी सायंकाळी पिकनिकसाठी गेलेल्या तीन मित्रांवर अनोळखी तरुणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात आशिष रोशन गोंडाणे यांचा मृत्यू झाला तर सुशिलकुमार मोतीराम गेडाम गंभीर जखमी झाला आहे.
फिर्यादी सुशिलकुमार गेडाम (वय ३३, रा. पाहुणे ले-आऊट, पिवळी नदी, नागपूर) हे मित्र आशिष गोंडाणे (वय ३३) आणि सचिन मुनिमहेश मिश्रा (वय ३१) यांच्यासह पिकनिकसाठी गेले होते. दुपारी सचिन मिश्रा काही कामानिमित्त ठिकाण सोडून गेला. सायंकाळी सुमारे १७.३० वाजता ४ ते ५ अनोळखी तरुणांनी त्यांच्याजवळ येऊन लायटर मागितला. लायटर दिल्यानंतर आरोपींनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले. फिर्यादी आणि आशिष यांनी त्यांना मज्जाव केला असता आरोपींनी दोघांवर दगडांनी हल्ला केला.
या हल्ल्यात सुशिल गेडाम बेशुद्ध झाला तर आशिष गोंडाणे यांना छातीत चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. दोघांनाही तातडीने कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आशिष यांना मृत घोषित केले. सुशिल गेडाम यांच्यावर सध्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी खापरखेडा पोलिस ठाण्यात सुशिल गेडाम यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1), 109, 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून तपास सुरू आहे.
या घटनेने परिसरात मोठा दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी नागरिकांना शांती राखण्याचे आवाहन केले आहे.









