नागपूर : शहरातील डोबी नगर परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रंगेहाथ पकडले असून, याप्रकरणातील मुख्य पुरवठादार अद्याप फरार आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
गांजाची तस्करी डोबी नगर, मोतीबाग येथील रेल्वे पटरी परिसरातून होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईत नूर मोहम्मद गफूर कुरैशी आणि अभिषेक सुरेश दहिया या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० किलो गांजा, मोबाईल फोन आणि इतर साहित्यासह एकूण सुमारे १.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान अटक आरोपींनी हा गांजा इरशाद उर्फ इच्छु पीर खान या व्यक्तीकडून घेतल्याची माहिती दिली. हा इच्छु पीर खान डोबी नगरचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, गांजाच्या तस्करीमागील संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.