मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे दोन मातब्बर नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार — यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. विचारधारा, कामाची पद्धत आणि नेतृत्वशैली या सर्वच बाबतीत यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक असतानाही आज हे दोघं महायुतीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत सहभागी आहेत. या दोघांचा राजकीय प्रवास जितका वेगळा, तितकाच प्रभावी आणि विलक्षण आहे.
राजकीय शैलीत फरक, पण नेतृत्वात साम्य-
अजित पवार हे थेटपणासाठी, गावरान भाषाशैलीसाठी आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. पहाटेपासून सुरु होणारा त्यांचा व्यस्त दिनक्रम, वेळेचं काटेकोर पालन आणि लोकांशी थेट संवाद यामुळे ते खेडोपाड्यातही अत्यंत लोकप्रिय आहेत. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा जनाधार विशेषतः भक्कम आहे.
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही अभ्यासू, संयमी आणि नियोजनबद्ध नेत्याच्या रूपात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून आलेले फडणवीस विदर्भात लोकप्रिय आहेत. त्यांची मुद्देसूद मांडणी, तर्कसंगत भाषणं आणि निर्णयक्षम धोरणं यामुळे ते आजही राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
पहाटेचा शपथविधी — राजकारणातील ऐतिहासिक वळण-
२०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर, अचानक पहाटेच्या सुमारास अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून शपथ घेतली. हा ‘पहाटेचा शपथविधी’ राज्याच्या राजकीय इतिहासातील एक न विसरणारा क्षण ठरला. ही युती फार काळ टिकली नाही, पण त्या घटनेने दोन्ही नेत्यांच्या राजकीय धाडसाची चुणूक राज्याला पाहायला मिळाली.
हजरजबाबी, वक्तशीर आणि कामाला कटिबद्ध-
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्यात एक साम्य आहे—ते म्हणजे हजरजबाबीपणा, वेळेचं काटेकोर नियोजन आणि प्रशासनावरची मजबूत पकड. हे दोघेही निर्णय घेण्यात धीट असून, वेळप्रसंगी तडजोड न करता ठोस भूमिका घेण्यास तयार असतात. त्यांच्या या गुणांमुळेच ते राज्याच्या राजकारणातील ‘हुकमी एक्के’ ठरले आहेत.
मतभेद असले तरी सत्तेसाठी जुळलेले हात-
विचारधारा भिन्न असली तरी, सत्तेची गणितं जुळवण्यासाठी हे दोघं आज एकत्र आले आहेत. ‘कधीही काकांपासून वेगळा होणार नाही’ असं म्हणणाऱ्या अजित पवारांना सोबत आणण्यात फडणवीसांनी यश मिळवलं. आणि हेच त्यांच्या रणनीतीचं मोठं यश मानलं जातं.
आज या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस! एकाच दिवशी जन्मलेले हे दोन राजकीय खेळाडू आज हातात हात घालून महाराष्ट्राचं भविष्य घडवत आहेत. त्यांची पुढील वाटचाल कोणता नवा वळण घेईल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.