Published On : Fri, Mar 23rd, 2018

तारिख पे तारिख आता बंद करा – आमदार सुनिल तटकरे

Advertisement

मुंबई: मुंबई -गोवा महामार्गाचा पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याला मोबदला देण्यासाठी रखडलेल्या प्रश्नाविषयी आमदार सुनिल तटकरे यांनी आज नियम १०१ अन्वये लक्षवेधी उपस्थित केली.

या लक्षवेधीद्वारे त्यांनी पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनीबाबत, घरे दुकाने व इतर मालमत्ताविषयक प्रलंबित दाव्यांकडे विधानभवनात लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

विभागीय आयुक्त कोकण यांच्यास्तरावरील लवादाचे दावे जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. मात्र या दाव्यांचे फक्त तारखा देण्यात येतात. कोणत्याही प्रकारची सुनावणी अदयाप घेतली जात नसल्याने तारीख पे तारीख देण्याचे बंद करा असे खडे बोल आमदार सुनिल तटकरे यांनी सुनावले.

उत्तरामध्ये महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदरप्रकरणात संबंधित लोकप्रतिनिधी व जिल्हाप्रशासन यांची सोमवारी विधानभवनात बैठक घेवून यातून त्वरीत मार्ग काढण्याचे आश्वासित केले. चर्चेवेळी आमदार सुनिल तटकरे यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडे इतर कामाचाही व्याप आहे परंतु यामधूनही वेळ काढून पळस्पे इंदापूर दरम्यानच्या लवादाच्या सुनावण्या मोहिम स्वरुपात घेवून एक महिन्याच्या आत निकाली काढण्यात याव्यात. जितका विलंब यामध्ये होणार आहे तेवढयाप्रमाणात अधिग्रहणाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे याप्रकरणी त्वरीत तोडगा काढून बाधित शेतकऱ्यांना न्याय दयावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. दरम्यान पळस्पे इंदापूरदरम्यान २८ ठिकाणीच्या जागा अधिग्रहीत करुन त्वरीत महामार्गाचे काम पूर्ण करावे अशी सुचना गटनेते जयंत पाटील यांनी चर्चेत भाग घेताना केली.