Published On : Mon, May 27th, 2019

जिल्हा भाजपातर्फे नवनिर्वाचित खा. कृपाल तुमाने यांचा सत्कार

Advertisement

नागपूर: जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे आज सायंकाळी रविभवनच्या हिरवळीवर रामटेक लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना युतीचे नवनिर्वाचित खासदार कृपाल तुमाने यांचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खा. तुमाने यांना ना. बावनकुळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी आ. अशोक मानकर, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष जयस्वाल, माजी जि.प.अध्यक्ष रमेश मानकर, माजी महापौर प्रवीण दटके, अशोक धोटे, भाजपा महिला पदाधिकारी मीनाताई तायवाडे, आनंदराव राऊत, संजय टेकाडे, अविनाश खळतकर, अरविंद गजभिये, रमेश मानकर, टेकचंद सावरकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांचे छोटेखानी भाषण झाले. भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केल्यामुळेच हा विजय झाल्याचे सांगून त्यांनी पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रचाराचे सूक्ष्म नियोजन होते. शेकडो प्रचारसभांमधून पालकमंत्र्यांनी प्रचार केला आणि विजय झाल्याचे ते म्हणाले. नागपूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया या तीन मतदारसंघाची जबाबदार पालकमंत्र्यांकडे होती. या तीनही मतदारसंघात भाजपा -शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. याप्रसंगी डॉ. राजीव पोतदार यांच्या हस्ते पालकमंत्री बावनकुळे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

विवेक मोवाडेंचा भाजप प्रवेश

या सत्कार कार्यक्रमातच सावनेर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष व नांदागोमुखचे सरपंच विवेक मोवाडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. लगेच त्यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य अरविंद बावनकर यांनी, दिलीप उईके यांनीही याप्रसंगी भाजपात प्रवेश केला. या दोन्ही पदाधिकार्‍यांसोबत शेकडो कार्यकर्ते आज भाजपमध्ये आले.