
मुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली रुग्णांकडून मोठी रक्कम आकारली जात असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीत समोर आले आहे. अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी होणारा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना रुग्णांच्या बिलात आकारला जात असल्याची बाब उघड झाली आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. वैद्यकीय उपकरणांवरील ट्रेड मार्जिनला मर्यादा घालून त्यांच्या किमतींचे नियमन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
FDAच्या तपासणीत केवळ IV सेटच नव्हे, तर इतर उपकरणांच्या किमतीतही मोठी तफावत आढळली. ६.७५ रुपयांना मिळणारी सिरिंज ५७.२० रुपये, तर २९.४१ रुपयांच्या कॅथेटरसाठी ३१० रुपये आकारले जात असल्याचे समोर आले. ऑक्सिजन मास्क आणि नेब्युलायझरसारख्या उपकरणांच्या दरातही मोठी वाढ आढळली.
रुग्णाला उपचाराच्या काळात उपकरणाची मूळ किंमत आणि त्यावर आकारला जाणारा नफा याची माहिती मिळत नसल्याने हा ‘माहितीचा अभाव’ रुग्णांसाठी आर्थिक अडचणीचा मुद्दा ठरत असल्याचे मुंढे यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणाची NPPAकडून दखल घेण्यात आली असून उत्पादक, वितरक आणि रुग्णालयांच्या मार्जिनचा आढावा घेतला जात आहे.महाराष्ट्रासोबतच पंजाब, राजस्थान आणि तमिळनाडूतूनही अशाच तक्रारी समोर आल्याने वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर देशव्यापी नियमनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.




