पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने FDAच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेला ₹5 लाख भरपाईचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे.
पुण्यातील गुरूनानक डेअरी अँड स्वीट्स येथे अन्नातून विषबाधेची तक्रार आल्यानंतर FDAने 12 जून रोजी तपासणी केली होती. यावेळी दुकानातील स्वच्छता, कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक स्वच्छता, नोंदवही आणि लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्या. त्यानंतर दुकानाचा परवाना निलंबित करून व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
दुकान मालकांनी त्रुटी दूर केल्याचा दावा केल्यानंतर 13 जुलै रोजी पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यात 36 पैकी 35 निकष पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, परवाना पुन्हा सुरू न झाल्याने मालकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
हायकोर्टाने FDAच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत दुकानाचा परवाना पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. तसेच व्यवसाय बंद राहिल्याने झालेल्या नुकसानीपोटी FDAला ₹5 लाख भरपाई देण्याचा आदेश दिला होता.
या आदेशाला पुढे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 5 ऑक्टोबर 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा ₹5 लाख भरपाईचा आदेश रद्द केल्याने FDAला मोठा दिलासा मिळाला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAची राज्यभर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.




