Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

तुकाराम मुंढेंचा दूध भेसळ माफियांवर मोठा प्रहार; १३ जण अटकेत, ३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Advertisement

मुंबई– गटराज्यातील दूध भेसळीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळ माफियांच्या जाळ्यावर घणाघाती प्रहार केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या संयुक्त मोहिमेत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे राज्यभर पसरलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा शोध घेत ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या समन्वयाने अत्यंत गुप्तपणे नियोजन करून रविवारी पहाटे एकाच वेळी पुणे (मंचर), अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर (सिल्लोड) आणि सोलापूर (अकलूज) येथे छापेमारी करण्यात आली.

तपासादरम्यान मंचर परिसर हा या अवैध व्यवसायाचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील विविध ठिकाणांवरूनही मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तयार करून राज्यभर पुरवठा होत असल्याचे उघड झाले.

कारवाईदरम्यान धक्कादायक बाब समोर आली. आरोपी दुधात मोठ्या प्रमाणावर पाणी मिसळून त्यात दूध पावडर, वासरहित शाम्पू आणि इतर रासायनिक पदार्थांचा वापर करून दुधाचा घट्टपणा आणि दर्जा कृत्रिमरीत्या वाढवत होते. हे भेसळयुक्त दूध नामांकित कंपन्यांच्या नावाने बाजारात विकले जात असल्याचा तपासात खुलासा झाला आहे.

Advertisement

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे २.५ ते ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. दुधामध्ये भेसळ करून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा रॅकेटला पाठीशी घातले जाणार नाही. अशा गैरप्रकारांविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.