Published On : Fri, Feb 26th, 2021

संवाद वृद्धिंगत करून पदाची उंची वाढविण्यास प्रयत्नशील : अविनाश ठाकरे

सत्तापक्ष नेता म्हणून स्वीकारला पदभार

नागपूर: मागील वर्षांमध्ये अनेक जबाबदा-या स्वीकारण्याची संधी नागपूर महानगरपालिकेतील सत्तापक्षाने दिली. आज त्याच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे मनपामध्ये नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके व अन्य पदाधिका-यांनी सोपविली आहे. हा आनंदाचा क्षण असला तरी जबाबदा-या आणि कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करण्याची शिकवण देणाराही प्रसंग आहे. सत्तापक्ष नेता या पदाची उंची मोठी आहे, सर्वांना सोबत घेउन सर्वांच्या प्रश्नांना न्याय देउन कार्य करण्याचे आव्हान यामध्ये आहे. या संपूर्ण पदाची गरीमा शाबूत ठेवून सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी संवाद वृद्धिंगत करून सत्तापक्ष नेता पदाची उंची अधिक वाढविण्यास सदैव प्रयत्नशील राहिल, असा विश्वास नवनियुक्त सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी (ता.२६) मनपा मुख्यालयातील सत्तापक्ष कार्यालयात मावळते सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी अविनाश ठाकरे यांच्याकडे पदभार सोपविला. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, माजी आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, माजी महापौर नंदा जिचकार, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक सर्वश्री प्रदीप पोहाणे, प्रकाश भोयर, डॉ. रवींद्र भोयर, संदीप गवई, प्रमोद तभाने, राजेंद्र सोनकुसरे, हरीश दिकोंडवार, प्रमोद तभाने, पल्लवी शामकुळे, श्रध्दा पाठक, ॲड. निशांत गांधी, प्रमोद कौरती, दीपक चौधरी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना नवनियुक्त सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शहरातील विकास कामे थांबली. त्यामुळे आपल्या कार्यकाळात हे मोठे आव्हान राहणार आहे. सर्वांना सोबत घेउन या संघर्षाच्या परिस्थितीवर मात करून सर्वांना उत्साहाने कार्य करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा वारसा सत्ताधारी पक्षाने पुढे ठेवून नेहमी कार्य केले आहे. तो वारसा आणि कार्याला गती देण्याची परंपरा पुढेही कायम ठेवण्यास कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

क्रियाशील कार्याचा वारसा पुढे नेतील : महापौर दयाशंकर तिवारी
सत्तापक्ष नेता हे मनपातील अत्यंत महत्वाचे पद आहे. मनपाच्या सभागृहामध्ये सत्तापक्ष नेत्याचे विवेचन हे अंतिम असते व त्यावर महापौर निर्णय देतात, एवढी मोठी गरीमा या पदाची आहे. मनपामध्ये सत्ता आल्यापासून आतापर्यंतच्या सत्तापक्ष नेत्यांनी आपले सर्वांना सोबत घेउन, समन्वयाने कार्याची गती कायम ठेवली. अनिल सोले, प्रवीण दटके, संदीप जोशी ते संदीप जाधव यांनी सत्तापक्षाची क्रियाशीलता कायम ठेवण्यात पूर्णपणे योगदान दिले. माजी महापौर संदीप जोशी यांच्या कार्यकाळात उद्भवलेल्या संकटप्रसंगात विकास कामांना खिळ बसली मात्र त्या काळातही सत्तापक्षाची क्रियाशीलता कायम ठेवून सर्वांना सक्रिय ठेवण्याचे कार्य संदीप जाधव यांनी सत्तापक्ष नेते म्हणून लिलया पेलली. नवनियुक्त सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे हे अनुभवी नेते आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष पुढे कर संकलन व कर समिती सभापती असा महत्वाच्या समित्यांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांच्या या अनुभवाचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला, हे विशेष उल्लेखनीय आहे. मनपाचे ९ झोन सभापती व १० विशेष समिती सभापती या सर्वांना सोबत घेऊन त्यांच्याकडून सक्रियपणे कार्य सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अविनाश ठाकरे हे त्यांच्या कार्यशैलीतून या सर्वांना न्याय देउन, सर्वांना सोबत घेउन, सर्वांच्या समन्वयाने क्रियाशील कार्याचा वारसा पुढे नेतील, असा विश्वास यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

सर्वांना न्याय देण्याचे कार्य कायम ठेवतील : आमदार प्रवीण दटके
मनपातील सत्तापक्ष नेते पदाची भारतीय जनता पक्षाची मोठी परंपरा आहे. पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी पेलविलेली ही जबाबदारी तरुण नगरसेवकांसाठी मार्गदर्शक आहे. माजी महापौर तथा माजी आमदार अनिल सोले, विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर संदीप जोशी यांच्यापासून ते आज संदीप जाधव यांच्यापर्यंत या सर्व नेत्यांनी या पदाला न्याय देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. मावळते सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सभागृहात सर्वांना समान न्याय देण्याचे कार्य केले. त्यांनी सर्वांची अडचण सोडवून त्यावर मार्ग काढण्याचेही कार्य केले. हे असेच कार्य नवनिर्वाचित सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे सुद्धा पुढेही करतील, असा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षश्रेष्ठींनी एकमताने त्यांचे नाव निश्चित केले. कार्यकाळ संपताच पदत्याग करण्याचा संदीप जाधव यांनी घेतलेला पुढाकार हा स्तूत्य आहे. मुळात ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. पक्ष, चळवळ, विकासाचा मार्ग पुढे सुरळीत ठेवण्यासाठी ही परंपरा पुढे अशीच अविरत सुरू राहिल. येणा-या काळातही भाजपाचाच सत्तापक्ष नेता असेल, असा विश्वास आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केला.

मावळते सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अडचणी आणि त्यावर सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या मदतीने केलेली मात याचे विवेचन केले. भारतीय जनता पक्षाने सत्तापक्ष नेता ही मोठी जबाबदारी सोपवून दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, नंदा जिचकार या सर्वांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या जबाबदारीला न्याय देता आले. येणा-या काळातही नवनियुक्त सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे या पदाला न्याय देत विकासाची परंपरा पुढे कायम ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संदीप जाधव यांनी तुळशीचे रोपटे देऊन त्यांना सत्तापक्ष नेताच्या आसनावर विराजमान केले. महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके यांनी केले. आभार प्रतोद श्रीमती दिव्याताई धुरडे यांनी मानले.