नागपूर : जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत ट्रक चालकाने मोटारसायकलस्वाराला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला असून 13 वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे.
बसनवतराव ब्रिजलाल कुमरे (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर उज्ज्वल मुन्ना गोंडाणे (वय 13) गंभीर जखमी झाला आहे.
माहितीनुसार, बसनवतराव आणि उज्ज्वल हे दोघेही मोटारसायकलवरून देवळापारमार्गे शिवनी या गावी जात होते. दरम्यान, मोरफाटाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले.
दोन्ही जखमींना देवलापार ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान बसवतराव कुमरे यांचा मृत्यू झाला, तर 13 वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. देवलापार पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.