नागपूर : राज्यातील विविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या संयुक्त महासंघाचे नेतृत्व करणारे जेष्ठ कर्मचारी नेते ग दि कुलथे यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले, त्यांच्या निधनाबद्दल विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या स्व.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित शोकसभे मध्ये राज्य शासनाच्या विविध संघटनांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते .
श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी अधिकारी महासंघाचे जेष्ठ नेते शिवदास वासे ,राजपत्रित अधिकारी महासंघ नागपूर जिल्हा अध्यक्ष व उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे ,डॉ. प्रमोद रक्षमवार, योगेश निंबुळकर, अशोक दगडे, संघमित्रा ढोके ,विपुल जाधव, अनिल गडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील 72 संघटना एकत्र करून महासंघ तयार करण्याची भूमिका कुलथे यांनी घेतली आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाकडे मांडण्याचे कार्य या महासंघाच्या माध्यमातून केले असून प्रसंगी शासनासोबत कठोर भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न तडीस नेण्याचे कार्य कुलथे यांनी केले आहे अशा शोक संवेदना श्री. शिवदास वासे यांनी व्यक्त केल्या.
वेळप्रसंगी शासनाशी संघर्ष करायचा असेल तेव्हा कर्मचाऱ्या ची भूमिका मांडली तसेच वेळप्रसंगी शासनासोबत समन्वयाची भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न यशस्वीपणे सोडण्यासाठी कुलथे यांनी कार्य केले आहे . कर्मचाऱ्यांसाठी मुंबई येथे कल्याण भवन ही बहुमजली इमारत तयार करून त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी महासंघाने केलेले कार्य हे महत्त्वपूर्ण असून कुलथे यांच्या स्वप्नातील ही भव्य वास्तू पूर्ण करणे म्हणजे त्यांना श्रद्धांजली ठरेल असे डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या .
यावेळी संघमित्रा ढोके डॉ. रक्षमवार , अशोक दगडे, योगेश निंबुळकर आदींनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. कुलथे यांच्या निधनामुळे अधिकारी व कर्मचारी संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे . कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी अहोरात्र झटणारा व धडाडीचा कर्मचारी नेता हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली .सर्व कर्मचारी संघातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.