Published On : Sat, Apr 27th, 2019

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामाला गती द्या – डॉ. कुमार

Advertisement

नागपूर: वृक्ष लागवड मोहिमेतील सर्व विभागांनी वृक्ष लागवडीचे केलेले नियोजन पाहता खड्डे खोदण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. वृक्ष लागवडीचा लक्ष्यांक गाठण्यासाठी खड्डे खोदण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

वृक्ष लागवड मोहीम 1 जुलै पासून सुरु होणार आहे. एप्रिलचा शेवटचा आठवडा सुरु असून वृक्ष लागवड मोहीम दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. या मोहिमेतील काही विभागाची प्रगती असमाधानकारक आहे. त्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेतील तीन महत्त्वाचे विभाग विशेषत: कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद या मोठ्या विभागांचा लक्ष्यांक पाहता रोज खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यांची गती वाढवावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

वृक्ष लागवड मोहिमेची लवकरच राज्यस्तरीय आढावा बैठक होणार आहे. तेव्हा या मोहिमेचे सर्व जिल्ह्यांनी सूक्ष्म नियोजन करावे. नियोजन करताना वृक्ष लागवडीचा लक्ष्यांक, उपलब्ध रोपे, रोपांचे वय, खड्डे, रोप वाहतुकीसाठी लागणारा खर्च, संबंधित यंत्रणेकडील मनुष्यबळ याचा विचार करावा. वनाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर बैठका घ्याव्यात. तसेच क्षेत्रभेटी देवून पाहणी करावी. शासकीय यंत्रणा म्हणून चाकोरीबद्ध काम न करता अधिकाऱ्यांनी मन लावून ही मोहीम यशस्वी करावी, अशी अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.

4 मे रोजी विभागीय स्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक वनीकरण, वन विभाग आदींची व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून कामाचा आढावा घेण्यात येईल.

जिल्हानिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट (लाखांत)

नागपुर 98.39, वर्धा- 87.52, भंडारा- 54.00, गोंदिया- 78.89, चंद्रपूर- 167.17, गडचिरोली- 108.24 असे जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या बैठकीला उपायुक्त के. एन. के. राव, वर्षा गौरकर, मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार यासह सर्व विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.