वर्धा – सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या युरोसर्जरी विभागात एड्रेनल ट्यूमर म्हणजेच अधिवृक्क ग्रंथीच्या असामान्य वाढलेल्या पेशी समूहाला काढणारी दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. पोटाच्या मध्यभागी मोठ्या आकारात वाढ झालेल्या ट्यूमरमुळे संपूर्ण आतडी आणि मूत्रपिंड यावर दाब पडत असल्याने रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.
स्थानिक ३३ वर्षीय तरूण रुग्णाला तीव्र वेदनादायी पोटदुखीमुळे सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सीटी स्कॅन व अन्य तपासण्या केल्या असता त्याच्या पोटात एड्रेनल ट्यूमरची मोठ्या आकारात वाढ झाल्याचे दिसून आले. मूत्रपिंडाच्या वर आढळणाऱ्या अधिवृक्क ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून विविध प्रकारचे हार्मोन्स तयार करतात. मानवी शरीरात साधारणतः ४ किंवा ५ सेंटीमीटर आकाराची एड्रेनल ग्रंथी असते.
मात्र या रुग्णाच्या शरीरात २० बाय १५ सेंटीमीटर आकारात ही ग्रंथी वाढलेली असल्याने तिचा दाब संपूर्ण आतडीवर व मूत्रपिंडावर निर्माण झाला होता. जायंट लेफ्ट एड्रेनल मायलोलिपोमाच्या निदानानंतर युरॉलॉजिस्ट डॉ. अभिजित ढाले यांनी शस्त्रक्रियेद्वारे हा ट्युमर काढण्याचा निर्णय घेतला.
अत्यंत काळजीपूर्वक ट्यूमर विच्छेदित करीत आणि कमीतकमी रक्तस्त्राव होईल याची काळजी घेत लेफ्ट एड्रेनालेक्टोमी फॉर जायंट एड्रेनल मास शस्त्रक्रिया डॉ. अभिजित ढाले, डॉ. जय धरमशी, डॉ. कपिल सेजपाल, डॉ. शिवचरण भालगे, डॉ. ऋतुराज पेंडकर, डॉ. घनश्याम हटवार, डॉ. अपूर्वा वैद्य यांनी बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. एन वर्मा यांच्या सहकार्याने पूर्णत्वाला नेली.
सावंगी रुग्णालयात एम्प्लॉयीज स्टेट इन्शुरन्स कार्पोरेशन म्हणजेच कामगारांसाठी असलेल्या आरोग्य विमा सेवा योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला असून शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सांगितले.