Published On : Thu, Jun 4th, 2020

ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरमुळे गंभीर रुग्णांचे वाचणार प्राण

Advertisement

नागपूर : अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) गंभीर स्वरूपातील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर प्रदान केले. कोविड रुग्णांप्रति एक कर्तव्य म्हणून त्यांनी हा मदतीचा हात दिला आहे. सोबतच मेयोला २०० तर मेडिकलला १०० पीपीई किटही उपलब्ध करून दिले.

मेयोमध्ये ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर नाही. यामुळे कोविडच नाही तर जो रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे त्याला इतर विभागातील विविध कक्षात किंवा चाचण्यांसाठी ने-आण करणे कठीण व्हायचे. आता ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरच्या साहाय्याने नागपुरातील कुठल्याही इस्पितळातील व्हेंटिलेटरवर असलेल्या कोविडग्रस्त रुग्णास हलविता येणार आहे. अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल आणि सचिव डॉ. संजय जैन यांनी हा पुढाकार घेतला.

एएमएसचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकांत मुकेवार, डॉ. नरेंद्र मोहता, डॉ. आर. आर. खंडेलवाल यांच्या हस्ते व आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण, डॉ. शेलगावकर, डॉ. तिलोत्तमा पराते, डॉ. सुनील लांजेवार, डॉ. जीवन वेदी, डॉ. राजन बारोकर उपस्थित होते. दरम्यान, अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेसद्वारे मेडिकलला १०० पीपीई किट देण्यात आल्या. यावेळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व डॉ. राजेश गोसावी उपस्थित होते.