
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी छेडलेल्या तीव्र आंदोलनाने नागपूर आणि आसपासच्या भागातील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-वर्धा, नागपूर-अमरावती, नागपूर-रायपूर आणि जबलपूर-हैदराबाद या चार प्रमुख महामार्गांवर चक्काजाम केला आहे. परिणामी १५ तासांहून अधिक काळ हजारो वाहने महामार्गांवर अडकून राहिली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गांवर अन्न-पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काहींनी गाड्यांमध्येच रात्र काढली तर काहींनी लेकरांना हातात धरून पायीच प्रवास सुरू केला. आउटर रिंग रोड परिसरात तर किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम असल्याने वाहतूक पोलिसांनाही प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
अडकलेल्या महिलांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाविषयी नाराजी व्यक्त केली. “शेतकऱ्यांसाठी लढा योग्य आहे, पण आम्हीही जगण्यासाठी झगडतो आहोत. आमच्यावर हा ताण का?” असा थेट सवाल त्यांनी केला. काहींनी सांगितलं, “सरकारला धडा शिकवताना आमचं जगणंच उद्ध्वस्त होतंय.”
दरम्यान, भक्ती देशपांडे नावाच्या महिलेला त्यांच्या वडिलांची बायपास सर्जरीनंतर रुग्णालयात भेट घ्यायची होती. मात्र आंदोलनामुळे त्या आणि त्यांच्या नातेवाइकांसह तीन महिलांना आणि लहान लेकरांना तब्बल १४ तास हॉस्पिटलमध्येच थांबावं लागलं. जेवण, पाणी आणि संपर्क यांची कोणतीही सोय नव्हती. अखेरीस त्यांनी पायी चालत दोन किलोमीटर अंतर पार करून हुडकेश्वरच्या दिशेने मार्गक्रमण केलं.
या चक्काजाममुळे बाजारपेठांमध्ये वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. भाजीपाला, इंधन आणि कच्चा माल घेऊन जाणारे ट्रक महामार्गावर अडकले आहेत. एका ट्रकचालकाने सांगितलं, “काल सायंकाळपासून गाडी हललेली नाही, जेवण-पाणी दोन्ही संपलं.”
प्रहार संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे, मात्र महामार्गांवरील ताण आणि गर्दी पाहता परिस्थिती नियंत्रणात आणणं अजूनही कठीणच ठरत आहे.










