Published On : Sat, Nov 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आजची स्वच्छता म्हणजे उद्याचे स्वस्थ जीवन

नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे यांचे प्रतिपादन
नागपूर-अमरावती विभागीय क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

नागपूर : आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेसह परिसर स्वच्छ राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आजची स्वच्छता म्हणजे उद्याचे स्वस्थ आणि निरोगी जीवन असेल याची जाणीव अधिकाऱ्यांनी नागरिकांना करून द्यायला हवी. असे प्रतिपादन नागपूर स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे यांनी केले. ते स्वच्छ महाराष्ट्र अभियान(नागरी) २. ० अंतर्गत आयोजित कार्यशाळा मार्गदर्शन करताना बोलत होते.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वच्छ भारत अभियानच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत (नागरी) शुक्रवारी (ता. ४) रोजी रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृह येथे नागपूर आणि अमरावती विभागाच्या विभागीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यशाळेचे अध्यक्ष नागपूर स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान(नागरी) २. ०चे संचालक श्री. समीर उन्हाळे, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपीन पालीवाल, नागपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्रीमती संघमित्रा ढोके, श्रीमती माधुरी मडावी यांच्यासह नागपूर आणि अमरावती विभागातील विविध महानगरपालिका, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, मुख्य अभियंता, नोडल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान(नागरी) २. ० अंतर्गत येत्या २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शहरांना ‘कचरामुक्त शहरे’ करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने विभागीय स्तरावर क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना नागपूर स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे म्हणाले की, आपण नेहमी आजार झाल्यावर उपचार घेतो, पण आजार होऊ नये यासाठी दक्षता घेत नाही. शाश्वत विकास हे स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता तसेच परिसराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छतेवर भर दिल्यास स्वस्थ निरोगी राखता येते. स्वच्छता ही मनातून यायला हवी, यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत मिळून स्वच्छतेच्या संदर्भात सातत्य आणायला हवे. असे म्हणत श्री चिन्मय गोतमारे यांनी नागपूर स्मार्ट सिटीद्वारे शहरात राबविल्या जाणाऱ्या विविध कार्याची माहिती दिली.

प्रयत्न केल्यास यश प्राप्ती निश्चित: श्री. समीर उन्हाळे
कार्यशाळेचे प्रास्ताविक स्वच्छ महाराष्ट्र अभियान(नागरी) २. ०चे संचालक श्री. समीर उन्हाळे यांनी केले, अभियानचे मुख्य उद्दिष्ट अधोरेखित करतांना ते म्हणाले की, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. त्यानुसार आता २०२६ पर्यंत राज्यातील प्रत्येक शहराला ‘कचरामुक्त शहर’ करण्याचे निर्धार केला आहे. राज्याची वाटचाल आता ODF+ शहरे वरून ODF++ व water+ शहरांकडे होत आहे. यासाठी स्वच्छता आणि आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण सेवा साखळीला योग्यरीत्या हाताळने आवश्यक आहे. आपण प्रयत्न केल्यास ही उद्दिष्टपूर्तीत नक्कीच यश मिळेल असे श्री. समीर उन्हाळे म्हणाले.

सहकार्याची चळवळ आवश्यक : श्री राम जोशी
कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी म्हणाले की, स्वच्छतेच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ ठेवण्यासाठी नागरिकांनी आपला दृष्टिकोन बदलत प्रशासनाला सहकार्य करायला हवे. लोकसहभागातून सहकार्याची चळवळ निर्माण झाल्यास अभियानाचे ध्येय पूर्ण होईल. असे श्री राम जोशी म्हणाले.

स्वच्छतेचा प्रवास सौंदर्यीकरण कडून नियोजनाकडे :श्री. विपीन पालीवाल
कार्यशाळेला मार्गदर्शन करताना चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपीन पालीवाल म्हणाले की, आपल्या शहराला गावाला स्वच्छतेच्या यादीत पुढे आणण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. स्वच्छतेचा प्रवास सौंदर्यीकरण कडून शहराच्या नियोजनाकडे जातो. त्यामुळे स्पर्धात्मक अभियानमध्ये स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. असे सांगत श्री. पालीवाल यांनी नागपूर महानगरपालिकेद्वारे केल्या जाणाऱ्या विविध कार्याचे कौतुक केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन वाडी नगरी परिषदचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी केले. कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisement
Advertisement