Published On : Sat, Jul 31st, 2021

साहित्यिक सुनील शिनखेडे यांना हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

Advertisement

– ३१ जुलैला सोलापुरात होणार वितरण

नागपुर – महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात येणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांना जाहीर झाला आहे.

अकरा हजार रुपये, चांदीचे स्मृती चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.आज, शनिवारी (३१ जुलै) सकाळी ११ वाजता जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रा. ए.डी. जोशी सभागृहात हा पुरस्कार शिनखेडे यांना प्रदान करण्यात येईल, अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

सुनील शिनखेडे हे मुळ वैदर्भीय आहेत. सोलापूर आकाशवाणीत सहाय्यक संचालक या पदावर आहेत.गंधाक्षरे, गंध कोवळे ऋतू , नवीन काही (कवितासंग्रह), उदकाचा गर्भ, मेघांची पालखी, शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर, (ललित लेख संग्रह), हिरव्या बोलीचा बहर (ना. धों. महानोर यांच्या कवितेची समिक्षा), बातमीची विविध क्षेत्रे (पुस्तक) अशी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे.

डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ. अनिल अवचट, प्रा. मिलिंद जोशी,अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे, क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना यापूर्वी दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.

कोरोनाच्या निर्बंधामुळे आज आयोजित कार्यक्रम निमंत्रतांच्या उपस्थितीत होईल. फेसबुकवर त्याचे आँनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी यांनी दिली.