Published On : Wed, May 9th, 2018

ताडगाव जंगलातील वाघ गायब !

Advertisement
Tigress

File Pic

नागपूर/समूद्रपूर: तालुक्यातील मंगरूळ सहवन परिक्षेत्रातील ताडगाव जंगलातून नियमित दिसणारे वाघ बेपत्ता झाले आहेत . परिणामी जंगलातील वन्यजीव संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने लाखो रुपये खर्ची घालून निर्माण केलेले  पाणवठे पाण्याविना कोरडे राहत असल्याने या जंगलातील तीन वाघ दुसऱ्या जंगलात स्थलांतरित झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत  आहे.

मागील चार – पाच वर्षापासून या जंगलात नियमित तीन वाघाचे वास्तव्य होते. यात एक वाघीण आणि तिच्या दोन बछड्याचा समावेश होता. यावेळी ताडगाव जंगलात कृत्रिम पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे  जंगलातील वाघासह अन्य वन्यप्राणी स्थिरावले होते. मात्र कालांतराने पाणवठे कोरडे राहत असल्याने या जंगलातील बरेसचे वन्यप्राणी दुसऱ्या जंगलात स्थलांतरित झाले आहे.

ताडगाव जंगलात सध्या वनविभागाने एक पाणवठा उभारला असून संपूर्ण जंगलातील वन्यप्राण्यांना याच पाणवठ्याच्या आधार आहे. नुकत्याच झालेल्या वन्यजीव प्रगणनेत या जंगलात एकही वाघ नसल्याचे निष्पन्न झाल्याने वन्यजीवप्रेमी चिंता व्यक्त करीत आहेत.

मंगरूळ सहवन परिक्षेत्र अडीच हजार हेक्टर मध्ये विस्तारलेले आहे. पूर्वी जंगलाच्या मध्यभागी एका पाणवठ्यावरून वन्यप्राण्याची तृष्णा तृप्ती भागविण्यात यायची. मात्र याठिकाणी बाहेरून कृत्रिम पाणी पुरवठा करण्यात यायचा. मात्र कालांतराने येथील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पाणी पुरवठा करणे बंद झाले. आणि बरेसचे वन्यप्राणी अन्य जंगलात वळते झाले. यावर्षी ताडगाव जंगलात पाणवठा निर्माण करण्यात आला आहे.

याठिकाणी सौरउर्जाप्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती नव्याने रुजू झालेले क्षेत्र सहाय्यक एस. एन. नरडंगे यांनी सकाळशी बोलतांना दिली. सध्या या जंगलात वाघ वगळता नीलगाय, हरीण, ससे, डुक्कर, माकड आदी वन्यप्राण्याची कळपे वास्तव्यास आहेत. या जंगलात दोन ते तीन पाणवठ्यांची निर्मिती केल्यास या जंगलातील वन्यप्राणी स्थलांतरित होणार नाही.शिवाय गावशिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करणार नाही. यासाठी जंगलात पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे.