
चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात वाघ आणि माणसं एकमेकांच्या अगदी जवळ येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे धोका अनेक पटींनी मोठा झाला आहे. पर्यटकांची अनावश्यक गर्दी, फोटो–व्हिडिओ काढण्याची धडपड आणि जंगलातील शांतता भंग केल्यामुळे आता वाघही रस्त्यावर येऊन वाहतूक अडवताना दिसत आहेत.
चंद्रपूर–मोहरली मार्ग ताडोबाच्या बफर भागात मोडतो. परंतु गेल्या काही महिन्यांत हा रस्ता वाघांच्या सततच्या हालचालीचा परिसर बनला आहे. नुकतेच मधु नावाच्या वाघिणीच्या पिलाने रस्त्याच्या मध्यभागी येऊन तासभर बसकण मारली. वाहनचालकांना वाटत होते की ते पटकन बाजूला होईल, पण पिलानं हट्टाने रस्ता सोडला नाही. हा सगळा प्रसंग आकाश आलम यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि व्हिडिओ क्षणातच व्हायरल झाला.
हा मार्ग गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्वाचा असूनही पर्यटक मात्र वाघ दिसावा म्हणून मुद्दामच येथे थांबत असल्याचेही दिसून येत आहे. हे वर्तन अत्यंत धोकादायक ठरत आहे, विशेषत: दुचाकीस्वारांसाठी. काही दिवसांपूर्वी केसलाघाट परिसरात एका वाघाने दुचाकीवाल्यांवर हल्ले केल्याची घटना नोंदली गेली होती. त्यापूर्वी एका अपघातात वाघिणीच्या पिलाचा मृत्यू झाल्यानंतर अशा हल्ल्यांत वाढ झाल्याचे सांगितले जाते.
वाघ दिसताच पर्यटक गाडीतून उतरून मोबाइल काढण्याची धडपड करतात, हे सर्वात गंभीर असून वनविभागाने काही महिन्यांपूर्वी अशा कृत्यांवर दंडही ठोठावला होता. तरीही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. उलट वाघांचे व्हिडिओ मिळवण्यासाठी रस्त्यावर गर्दी वाढताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वीही एक प्रौढ वाघ या रस्त्यावर येऊन वाहनांचा मार्ग रोखून बसला होता. तो जांभया देत, लोळत बसल्याने दोन्ही बाजूंना गाड्यांची मोठी रांग लागली होती. वनविभागाने पुन्हा एकदा सर्वांना नियम पाळण्याचे आवाहन केले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.









