
नागपूर– शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी नंतर अटक केली आहे.
यशोधरा नगर परिसरातील पिली नदी परिसरात ही घटना घडली. आरोपी कुणाल संतापे याने आधी मुलीच्या भावासोबत शिवीगाळ करत वाद घातला. वादाचे रूपांतर अचानक हिंसाचारात झाले आणि कुणालने चाकूने वार करत तरुणाला गंभीर जखमी केले. हा प्रकार पाहून अल्पवयीन मुलगी मध्ये पडताच आरोपीने तिच्यावरही निर्दयपणे चाकूने हल्ला केला.
जखमी भावंडांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलिसांनी या प्रकरणी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपी कुणाल संतापेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस तपासात उघड झाले आहे की आरोपी कुणाल हा पीडित अल्पवयीन मुलीचा शेजारी राहत होता आणि दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांना या नात्याची माहिती मिळाल्यानंतर मुलीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. याच कारणावरून कुणाल चिडलेला होता. मुलीचे इतर कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या मनात निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा पाऊल उचलत ही थरारक वारदात घडवून आणली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.








